Tuesday, April 16, 2024

Latest Posts

UNION BUDGET 2024: विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प हा विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे आभार मानले. केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, या अंतरिम अर्थसंकल्पात विशेषत: महिला, शेतकरी, गरिब, युवा आणि मध्यमवर्गीय अशा सर्वच घटकांकडे विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न झाला आहे. १ कोटी कुटुंबांना सोलर यंत्रणा देऊन ३०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा संकल्प यात आहे. गरीब, चाळीत, झोपडपट्टीत राहणारे, मध्यमवर्गीय यांना स्वत:चं घर घेण्यासाठी योजना तयार करण्यात येणार आहे. १ लाख कोटींचा व्याजमुक्त निधी तयार करुन युवांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय तर अतिशय क्रांतिकारी आहे. यातून आमचे युवा हे मोठ्या प्रमाणात उद्यमी होतील. यातून संशोधनाला आणि स्टार्टअप इकोसिस्टीमला मोठी चालना मिळेल.

‘लखपती दिदी’ या कार्यक्रमातून ३ कोटी भगिनींना लखपती बनविण्याचा संकल्प सुद्धा करण्यात आला आहे. ९ कोटी महिलांना महिला बचत गटांच्या माध्यमातून अर्थकारणाच्या केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न आहे. ११ लाख कोटींची गुंतवणूक रस्ते, रेल्वे, पायाभूत सुविधांसाठी करण्यात येते आहे. यातून विकासाला मोठी चालना मिळेल. या गुंतवणुकीतून एकिकडे पायाभूत सुविधा निर्माण होत असताना रोजगारात सुद्धा वृद्धी होणार आहे. शेतकर्‍यांसाठी नॅनो डीएपी ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे. शेतकर्‍यांच्या शेतमालाला भाव आणि थेट बाजारपेठेशी जोडणी यासाठीच्या विविध योजनांचा ऊहापोह या अंतरिम अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. विकासाची दिशा सांगणारा पण त्याचवेळी आर्थिक शिस्त पाळणारा असा हा अंतरिम अर्थसंकल्प आहे. विकसित भारताचा रोडमॅप पूर्णकालीन अर्थसंकल्पातून येईल, हा आत्मविश्वास देणारा सुद्धा हा अर्थसंकल्प आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

अशोक सराफ यांचा जीवनप्रवास,आणि मजेशीर किस्से

Manipur violence : मणिपूर मध्ये हिंसाचाराचे सत्र सुरूच, गोळीबारात २ मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss