Monday, May 20, 2024

Latest Posts

Akshaya Tritiya आणि सोनं खरेदीचा संबंध काय?

वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला दरवर्षी महाराष्ट्रात अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. ह्याच दिवशी महाभारता सारख्या कलहकालाचा अंत झाला व त्रेतयुगाचा म्हणजे सत्ययुगाचा प्रारंभ झाला असल्याने ह्या पूर्ण दिवसाला ‘मुहूर्त’ म्हणतात. हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या ह्या दिवशी केलेले सत्कार्य माणसाच्या आयुष्यात अक्षय्य म्हणजेच कधीही न संपणारे फळ देते.

ह्या सणाबद्दल हिंदू पुराणात अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. असं म्हणतात की ह्याच दिवशी गंगा नदी पृथ्वीवर अवतरली.

हा सण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे. कुबेर हा धनाचा देव मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान कुबेर यांना वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अल्कापुरी राज्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांना स्वर्गाची आर्थिक व्यवस्था देखील हाताळण्यास सांगितले होते. कुबेर यांना भगवान शिवाने श्रीमंत होण्याचे वरदान दिले होते. त्यामुळे अक्षय्य तृतीयेचा सण अधिक महत्त्वाचा मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी कुबेर देव आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने धन आणि व्यापारात वृद्धी होते. म्हणूनच ह्या दिवशी सत्कार्य, दान-धर्म, पूजा-अर्चा ह्याच बरोबर सोनं खरेदीला महत्त्व दिले जाते. संपत्तीचे प्रतीक असण्यासोबतच, सोने परंपरा, वारसा आणि समृद्धीचे प्रतीक आहे.

भारतात सोन्याची खरेदी केवळ गुंतवणूक करण्यासाठी नाही तर विविध सणसमारंभासाठी देखील केली जाते. आर्थिक अनिश्चितता आणि शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांना सोन्यात केलेली गुंतवणूक सुरक्षित वाटते, मात्र अलिकडच्या काळात सोन्याच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे ते सर्व-सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलंय का? हा प्रश्न खुणावू लागलाय.  गेल्या सहा महिन्यातल्या सोन्याच्या दराची वाढ सर्व-सामान्यांना अचंबित करणारी आहे. वर्षानुवर्षांच्या विश्वासाचे प्रख्यात सोने विक्रेते वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या विश्वनाथ पेठे यांना याबाबत विचारले असता त्यांनी सोन्याचे दर वाढण्याची अनेक कारणं नमूद केली, जसं की –

१. आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धसदृश परिस्थिती

२. इतर देशात गोल्ड बाँड वर वाढलेला इंटरेस्ट रेट व त्यामुळे त्या देशात सोन्याच्या मागणीत झालेली वाढ

३. रूपी – डॉलर एक्सचेंज रेट

प्रत्येक देश हा किमान १५% गुंतवणूक सोन्यात करत असतो असही त्यांनी नमूद केले. त्यामुळे प्रत्येकाला शक्य होईल तसं किमान १०% गुंतवणूक (किमान ५-१० वर्षांच्या कालावधीसाठी) सोन्यात करावी असाही त्यांने सल्ला दिला. सोन्यात गुंतवणूक करण्याचा सर्वात सामान्य मार्ग म्हणजे प्रत्यक्ष सोने खरेदी करणे. त्यातच वळी व नाणी घेणं हे गुंतवणुकीच्या दृष्टीने फायद्याचे, कारण त्यात घडणावळ लागत नाही व जेवढ्यास तेवढा परतावा मिळतो.

बाजारात पारंपरिक सोनारांबरोबरच आपण सध्या अनेक ब्रँड्स जसं की तनिष्क, कल्याण ज्वेलर्स, जोयालुक्कास इ. लोकप्रिय होतांना बघत आहोत. ह्या सोनारांकडल्या सोन्याची शुद्धता ही हॉलमार्क बघून पारखता येते ज्यामुळे फसवणुकीची शक्यता फार कमी होते. पारंपरिक मराठमोळ्या दागिन्यांबरोबर, हे ब्रँड्स उत्तम डिझाईनचे व नाजूक, रोजच्या वापरासाठीचे दागिने लाँच करून त्यावर अनेक आकर्षक ऑफर्स असल्याने ते लोकांच्या पसंतीस उतरतायत. त्यामुळे पारंपरिक महाराष्ट्रीयन पेढ्यांसमोर अनेक आव्हानं येऊन उभी राहिली आहेत.

सोन्याचे वाढते दर व देशातील तरुण गुंतवणूकदारांच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर देशातील सोन्यात गुंतवणूक करण्याच्या पद्धतींमध्ये मोठे बदल झाले आहेत. काळानुरूप ह्या तरुण पिढीने आता हे न परवडणारं भौतिक सोनं म्हणजेच- दागिने, गोल्ड कॉइन हे मार्ग न निवडता आता अनेक वेगवेगळ्या मार्गांनी सोन्यात गुंतवणूक सुरू केली आहे. गोल्ड ETF, रिझर्व्ह बँकेचे SGB, डिजिटल गोल्ड ह्या मार्गांनी चक्क घरबसल्या आपण फक्त ₹५०० रुपयांपासून डिजिटल स्वरूपात सोनं खरेदी करू शकतो. शिवाय हे सगळे पर्याय भारत सरकार मान्य आहेत व ह्यात भौतिक सोन्यासारखी फसवणुकीची कोणतीही शक्यता नाही.

ह्या अक्षय्य तृतीयाला आपण कुठच्या स्वरूपात सोनं विकत घेणार आहोत हा विचार नक्की करायला हवा.

– अवंती विनोद-देसाई

हे ही वाचा:

जागतिक रेडक्रॉस दिवस का साजरा करतात? | Red Cross Day | Henry Dunant

“जागतिक रेडक्रॉस दिन” नेमका काय आहे ? जाणून घ्या इतिहास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss