Friday, May 10, 2024

Latest Posts

रामदास भाईंनी ‘या’ नेत्याला झापले, जरा तोंड आवरा!

शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी सोमवारी आपल्या सेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला.

मुंबई -टीम टाईम महाराष्ट्र  : शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी सोमवारी आपल्या सेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत शिवसेनेने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतरही सोमवारी गप्प बसलेल्या रामदास कदम यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांच्या वेगवेगळ्या वाहिन्यांसमोर मुलाखती देत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार अजित पवार,अनिल परब आणि अरविंद सावंत यांची यथ्थेच्छ धुलाई केली. या फटकेबाजीत त्यांनी एका नेत्याचं नाव घेणे टाळलं आणि राजकीय महाभारतातील या नेत्याकडे दुर्लक्ष करत या नेत्याचा ‘पॉलिटिकल सेन्सेक्स’ कदम यांनी खाली आणला. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या या प्रसिद्धीच्या झोतातील सेनानेत्याने रामदास कदम यांना फोन केला. संतापलेल्या कदम यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्याचक्षणी शिवसैनिकांची ‘बुलंद तोफ’ समजल्या जाणाऱ्या कदम यांनी या नेत्याचा दूरध्वनीवरूनच खरपूस समाचार घेतला आणि त्यानंतर या नेत्याला आपल्या ‘पालखी’ बंगल्यावर चहा- पाण्यासाठी निमंत्रितही केलं.

शिवसेना नेते रामदास कदम यांनी सोमवारी संघटनेच्या नेते पदाचा राजीनामा दिला.त्यानंतर पक्षाने त्यांची हकालपट्टी केल्याचं प्रसारमाध्यमांना कळवलं. या घटना घडत असताना कदम यांनी सोमवारी शांत राहणंच पसंत केलं. त्यानंतर मंगळवारी मात्र रामदास कदम यांनी आपल्याकडचा दारुगोळा बाहेर काढला. या तोफगोळ्यांच्या माध्यमातून रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षप्रमुख-माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि या दोन्ही पितापुत्रांचे चाणक्य असलेले अनिल परब यांच्यावर तुफानी हल्ला चढवला. जवळपास दीड डझन वृत्तवाहिन्यांना रामदास कदम यांनी मंगळवारी मुलाखती दिल्या. यातल्या काही वाहिन्यांच्या कॅमेरासमोर रामदास कदम यांनी भावना अनावर झाल्यामुळे अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

शिवसेनेची मुलुख मैदान तोफ पक्षाच्या राजकीय वाताहातीमुळे आणि त्यानंतर पक्षातून झालेल्या आपल्या हकालपट्टीमुळे भावनाविवश झाली होती. सेनेचा हा कोकणी ढाण्या वाघ भावनांना वाट मोकळी करून देतोय हे दृश्य वाहिन्यांवर बघून शिवसेनेतील अनेक मंडळी विचलित झाली होती. मात्र हकालपट्टी नंतर रामदास कदम यांना प्रसारमाध्यमांनी डोक्यावर घेतले हे लक्षात येताच एरवी विनाकारणही प्रसारमाध्यमांसमोर येत शब्दांचे बुडबुडे हवेत सोडणाऱ्या आणि ‘दरबारी राजकारणातून’ दिल्ली दरबारातली खुर्ची गेली दोन दशक उबवणाऱ्या या नेत्याने कदम यांना फोन केला. सायंकाळी चार वाजताच्या सुमारास कदम यांच्या कांदिवली येथील ‘पालखी’ बंगल्यावरील लँडलाईन वर या नेत्याने फोन केला. सुमारे आठ मिनिट झालेल्या या संभाषणात पत्रकबाजी आणि स्टंट करण्यात माहीर असणाऱ्या या नेत्याने कदम यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कदम म्हणाले, उद्धव ठाकरे यांना मला आणि माझ्या आमदार मुलाला तसेच संपूर्ण कदम खानदानीला राजकारणातूनच नव्हे तर आयुष्यातून उठवायचे होते. असा गौप्यस्फोट शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला. हा गौप्यस्फोट करताना कदम यांनी माजी मंत्री आणि कोकणातील शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीचा हवाला दिला. ठाकरे यांना रामदास कदम कुटुंबियांचे अस्तित्व संपवायचे होते ही माहिती बंडखोर आमदारांच्या बैठकीमध्ये उदय सामंत यांनी रामदास कदम यांच्या उपस्थितीतच दिली. याबाबत सविस्तर वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी रामदास कदम यांनी उदय सामंत यांना थेट ‘पालखी’ बंगल्यावर चहापाण्यासाठी येण्याची विनंती केली आहे. त्यानुसार सामंत बुधवारी सकाळी कदम यांची भेट घेणार आहेत. सामंत यांनी नेमकं काय सांगितलं ते समजून घेण्याचा प्रयत्न शिवसेनेत राहून सेनेच्या राजकीय विरोधकांच्या पालख्यांचे ‘भोई’ बनलेल्या या नेत्याने केला असता, रामदास कदम यांनी या नेत्याचीही कान उघडणी केली. या नेत्याला त्याच्याच ‘रोखठोक’ शैलीत सुनावताना कदम म्हणाले, या ५१ आमदारांना गद्दार म्हणताना तुम्ही विचार करायला हवा होता. हे उठाव करणारे आमदार गद्दार नाहीत. एखादा- दुसरा आमदार तुम्ही म्हणतात असा गद्दार असू शकतो मात्र लोकांमधून निवडून आलेले ५१ आमदार जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात उठाव करतात याचं आत्मपरीक्षण केलं जायला हवं. त्याच वेळी तुम्ही सुद्धा जर आपल्या तोंडाला आवर घातला असता तर बरं झालं असतं. आपण काय बेलगाम सुटला होतात! आणि त्यातूनच हे आमदार दुखावले गेले ही गोष्ट दुर्लक्षित करता येणार नाही. असं या बोलघेवड्या नेत्याला ठणकावून सांगताना रामदास कदम यांनी शिवसेनेच्या या दरबारी राष्ट्रीय नेत्याला चहापानाला पालखीवर येण्याचे निमंत्रणही दिलं. संभाषणाच्या शेवटी कदम म्हणाले, शक्य झाल्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनोमिलन करण्याचा प्रयत्न सगळ्यांनीच आपापल्या परीने करायला हवा. अन्यथा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा अपरिमित नुकसान होईल. मी तो प्रामाणिक प्रयत्न करणार आहे तुम्हाला जमलं तर माझ्या प्रयत्नांना साथ द्या. असं सांगायलाही माजी मंत्री रामदास कदम विसरले नाहीत.

हेही वाचा : 

‘वो तेरे प्यार का गम’ अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या

 

Latest Posts

Don't Miss