Friday, May 3, 2024

Latest Posts

सभागृहातील भाषणावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक

भाषणाच्या सुरुवातीलाच शिंदे आपल्या मुलांच्या आठवणीत भावूक झाले.

एकानाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केल्यानंतर लगेच महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आणि सरकार कोसळले. पुढे शिंदे आणि फडणवीस यांनी एकत्र येत नवे सरकार स्थापन केले. आज विधानसभेत बहुमत सिद्ध करून नव्या शिंदे आणि फडणवीस सरकारने दावा पक्का केला आहे. सभागृहात सर्व नेत्यांनी भाषणे केली. विश्वास दर्शक ठराव जिंकल्यावर राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी भाषण केले.

भाषणाच्या सुरुवातीलाच शिंदे आपल्या मुलांच्या आठवणीत भावूक झाले. माझ्या डोळ्यासमोर माझी दोन्हीं मुलं गेली. या वाईट प्रसंगातून जाताना मला धर्मवीर आनंद दिघेंनी आधार दिला. त्यानंतर मी संघटनेच्या कामात व्यस्त राहू लागलो. त्यामुळे मला माझा मोठा मुलगा श्रीकांत ला ही वेळ देता येत नव्हता. मी घरी उशिरा यायचो आणि तो लवकर निघून जायचा. आज तो डॉक्टर आहे. मी माझा संपुर्ण वेळ संघटनेला दिला. असं म्हणत ते भावूक झाले.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर सुरुवातीला मुख्यमंत्री म्हणून मलाच पसंती होती. परंतू अजित पवार व आणखीन कुणीतरी मला मुख्यमंत्री बनवू नये असे सांगितले. त्यावेळी मीच उद्धव ठाकरेंना सांगितलं, मला काहीच अडचण नाही आपण मुख्यमंत्री व्हावं मी आपल्या सोबत आहे. माझा कधीच मुख्यमंत्री पदावर डोळा नव्हता. आम्ही नेहमीच बाळासाहेबांचे आणि धर्मवीर आनंद दिघेंचे शिवसैनिक राहू. मला फक्त इतकचं सांगायचं आहे, आज तुम्ही त्यांच्यासोबत आहात ज्यांनी ६ वर्ष बाळासाहेबांच्या मतदानावर बंदी आणली होती.

पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मला विचारतात बंड का केलं ? विधान परिषद निवडणुकीत मिळालेल्या वागणुकीमुळे मी अस्वस्थ होतो. माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न ही यावेळी करण्यात आला. त्यामुळे मी हा निर्णय घेतल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. माझ्यासोबत असलेल्या एकाही आमदाराने मला किती दिवस लागतील असा प्रश्न केला नाही. त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्यामुळे आज मी इथे आहे. आम्ही सगळे स्वार्थासाठी नव्हे तर विचारांसाठी एकत्र आलो आहोत असेही, एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

 

Latest Posts

Don't Miss