Monday, May 29, 2023

Latest Posts

बक्षिसाच्या रकमेबरोबरच मनोरंजनही होणार डबल!, २९ मेपासून सुरु होणार ‘कोण होणार करोडपती’ चे नवं पर्व

ज्ञान हे माणसाकडे असलेलं एक उत्तम साधन आहे. त्याच्याकडच्या या साधनाचा वापर करून तो अनेक गोष्टी साध्य करू शकतो. त्याच ज्ञानाचा वापर करून पैसे मिळवण्याची संधी देणारा कार्यक्रम म्हणजे कोण होणार करोडपती.

ज्ञान हे माणसाकडे असलेलं एक उत्तम साधन आहे. त्याच्याकडच्या या साधनाचा वापर करून तो अनेक गोष्टी साध्य करू शकतो. त्याच ज्ञानाचा वापर करून पैसे मिळवण्याची संधी देणारा कार्यक्रम म्हणजे कोण होणार करोडपती. सोनी मराठी वाहिनीवर २९ मे पासून सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेते सचिन खेडेकर यांच्याकडे आहे. या कार्यक्रमात यंदा बक्षिसाची रक्कमही दुप्पट करण्यात आली आहे. पण, या दुप्पट रकमेसह एक आगळावेगळा ट्विस्ट देखील प्रेक्षक आणि स्पर्धकांना पाहायला मिळणार आहे.

खरं तर ‘कोण होणार करोडपती’ च्या हॉटसीट वर बसून करोडपती होण्याचे अनेकांचं स्वप्न आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रेक्षक बरेच वर्षे प्रयत्नशील असतात. मात्र यातील काही लोकांनाच या शो मध्ये सहभागी होण्याची आणि मोजक्याच लोकांना हॉटसीट वर बसण्याची संधी मिळते. सोनी मराठी वाहिनीने प्रेक्षकांना पुन्हा एकदा करोडपती होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. आता मागे नाही राहायचं असं सांगत ‘कोण होणार करोडपती’ हा लोकप्रिय कार्यक्रम स्पर्धकांसाठी आता एक नाही तर तब्बल २ करोड रुपये जिंकण्याची संधी घेऊन आला आहे. हो, हे खरंय म्हणजेच ‘कोण होणार करोडपती’ कार्यक्रमात आता बक्षिसाची रक्कम डबल झाली आहे. प्रश्नोत्तराच्या या मनोरंजक खेळात सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांचे दमदार निवेदन आणि दिलखुलास संवादकौशल्य प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. तर आता मागे नाही राहायचं असं ब्रीददवाक्य घेऊन येत आहे ‘कोण होणार करोडपती’चा येत्या २९ मे पासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वा. पासून सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Time Maharashtra (@timemaharashtra)

आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याच स्वप्न ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाने सामान्य टीव्ही प्रेक्षकांना दाखवलं, अन् अल्पावधीतच हा शो तूफान लोकप्रिय झाला. या कार्यक्रमातील उत्कंठावर्धक प्रश्नांच्या खेळाने कित्येक सामान्य माणसाचं करोडपती होण्याचं स्वप्न सत्यात उतरवल. अन् आता पुन्हा एकदा हा मंच स्पर्धकांच्या स्वप्नपूर्तीसाठी सज्ज झाला आहे. ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्वसामान्यपणे कार्यक्रमाच्या प्रसारणाला सुरुवात होण्यापूर्वी रजिस्ट्रेशन सुरू होते. मात्र यंदा ज्या इच्छुक स्पर्धकांनी अजूनही रजिस्ट्रेशन केलेले नाही किंवा संधी मिळालेली नाही अशा स्पर्धकांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. त्यासाठी काय करावे लागणार ? हे जाणून घेण्यासाठी ‘कोण होणार करोडपती’ चा २९ मे रोजीचा पहिला भाग पाहायला विसरू नका.

‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमामध्ये प्रश्नोत्तराच्या उत्कंठावर्धक खेळाबरोबरच सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांच दिलखुलास आणि बहारदार सूत्रसंचालन हे देखील प्रमुख आकर्षण आहे. खेडेकरांची स्पर्धकांना आपलेसे करून बोलते करण्याची पद्धत आणि त्यांचं प्रभावी संवाद कौशल्य प्रेक्षकांचं मनं जिंकून जातं. कधी भावूक करणारे क्षण तर कधी प्रेरणा देणारे किस्से हे देखील नेहमीच या कार्यक्रमाचा अविभाज्य भाग राहिले आहेत. ‘कोण होणार करोडपती’ मध्ये समाजातील विविध सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या स्पर्धकांचा सहभाग असतो. तर पहायला विसरू नका ‘कोण होणार करोडपती’ सोमवार ते शनिवार रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

या वेळी बोलताना ‘कोण होणार करोडपती’चे सूत्रसंचालक, सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर म्हणाले, ‘आता मागे नाही राहायचं, आपल्या माणसाला जिंकताना बघायचं, अशी या पर्वाची टॅग लाईन आहे. प्रत्येक मराठी माणसाची थोड्याफार प्रमाणात अशीच मानसिकता असते. आपण अधिक सावधपणे पावलं टाकत असतो. मी नाटकांमध्ये काम करायचो, तेव्हा मालिकांबद्दल विचारणा व्हायची तर मी पण असाच, जाऊ दे ना कशाला . . बरं चाललंय ना, अशी माझीही मानसिकता असायची. पण एक पाऊल तसंच पुढे टाकताना आपण एक पाऊल मागे जात असतो. त्यामुळे आता मागे नाही राहायचं. मला नेहमी वाटतं की, सामान्य ज्ञानाचा अभ्यास कसा करणार? स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक स्पर्धक या खेळात येतात. पण स्पर्धा परीक्षांची तयारी म्हणजे सगळी तयारी नाही. कारण सर्वच स्पर्धक अभ्यास करून आलेलेच असतात, पण हॉट सीटवर बसल्यावर काही सुचतच नाही. अशा वेळी स्पर्धकांना रिलॅक्सिंग वातावरण तयार करून देणं ही मोठी जबाबदारी असते माझ्यावर.’

सोनी मराठीचे बिजनेस हेड अजय भाळवणकर म्हणाले, ‘कोण होणार करोडपती’चे हे नवे पर्व आपल्या भेटीला येत आहे. या पर्वाची वैशिष्ट्ये म्हणजे, यंदा बक्षिसाची रक्कम दुप्पट म्हणजे दोन करोड रुपये करण्यात आली आहे. शिवाय यंदा १५ ऐवजी १६ प्रश्नांचा खेळ असणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या पर्वात सहभागी होण्यासाठी १४ लाख मिस कॉल आले आहेत. ही संख्या मागच्या वर्षापेक्षा दुपटीने जास्त आहे. त्यांतील दोनशे स्पर्धकांची निवड या पर्वासाठी करण्यात आली आहे.

सोनी मराठीचे क्रिएटिव्ह डायरेक्टर अमित फाळके म्हणाले, एखाद्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणं आणि ‘कोण होणार करोडपती’चं सूत्रसंचालन करणं ह्या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. कारण या कार्यक्रमात तांत्रिक बाबी अधिक आहेत. सचिन खेडेकर यांच्या प्रत्येक शब्दावर हा खेळ पुढे सारकतो. मात्र बॅक ऑफ द स्टेज अनेक तंत्रज्ञ त्या वेळी काम करत असतात.

हे ही वाचा:

Arvind Kejriwal आले विरोधकांना जोडण्यासाठी, आज घेणार शरद पवारांची भेट

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss