Sunday, April 28, 2024

Latest Posts

मतदारांची दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर येणार नियंत्रण, पण कसे?

भारत निवडणूक आयोगाने दिनांक १६ मार्च, २०२४ रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर  केला आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघासाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. दिनांक १७  ते  २२ मार्च २०२४ या कालावधीत राज्यात १ लाख ८४ हजार ८४१ इतक्या नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम् यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघ येथे लोकसभा निवडणूक २०२४ बाबत माहिती देण्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत एस. चोक्कलिंगम् यांनी निवडणुकीसंबंधित माहिती दिली. पहिल्या टप्प्यात विदर्भातील ५ लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक १९ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठीचे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक २० मार्च  पासून सुरु झाली आहे. नामनिर्देशनपत्रे सादर करण्याची अंतिम दिनांक २७ मार्च ही आहे. नामनिर्देशनपत्राची छाननी २८ मार्च रोजी करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ३० मार्च आहे. त्या दिवशी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी निश्चित होणार आहे.

माध्यम देखरेख व नियंत्रण कक्ष स्थापन

आजपर्यंत रामटेक-१, नागपूर-५, भंडारा-गोंदिया-२, गडचिरोली-चिमुर-२ व चंद्रपूर-० इतके नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाले आहेत. राज्यात प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, डिजिटल मिडिया, सोशल मिडीयावर निवडणुकांशी संबंधित प्रसारित होणाऱ्या खोट्या, मतदारांची दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व अशा बातम्यांना जलद प्रतिसाद देण्यासाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालय स्तरावर माध्यम देखरेख व नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. माध्यम देखरेख व नियंत्रण कक्षामार्फत फेक न्युजबाबत प्राप्त माहितीबाबतचा दैनंदिन अहवाल भारत निवडणूक आयोगास सादर करण्यात येत आहे. जिल्हास्तरावर देखील जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे माध्यम देखरेख व नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम् यांनी दिली. यावेळी सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती) डॉ.राहूल तिडके, अवर सचिव  तथा उप निवडणूक अधिकारी शरद दळवी उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss