Monday, April 29, 2024

Latest Posts

ठाकरेंच्या हालचालींना वेग; कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंच्या विरोधात केदार दिघे अशी लढत होण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना अजूनही जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही.

लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना अजूनही जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यातच आता उद्धव ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदेंना धक्का देण्याची तयारी केली जात आहे. कल्याण लोकसभा मतसंघ हा श्रीकांत शिंदेंचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. याच कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याविरोधात स्व. आनंद दिघे (Anand Dighe) यांचे पुतणे केदार दिघे (Kedar Dighe) यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यात २० जागा लढवण्यात आहेत. त्यातील कल्याणची जागा ही हिटलिस्टवर आहे.

ठाकरे गट २० जागा लढवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्या २० ठिकाणी ठाकरे गटाचे उमेदवारही अंतिम असल्याचे सांगण्यात आले आहे. कल्याणमधून स्व. आनंद दिघेंच्या पुतण्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरण्याची चाल ठाकरे गटाकडून रचली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कल्याणच्या जागेवर भाजपकडून दावा करण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याणसाठी अडून बसल्याने भाजपने ती जागा शिवसेनेसाठी सोडली आहे. त्याबदल्यात भाजपने मुंबईमधली जागा आपल्या पदरात पाडून घेतली आहे. या सर्व राजकीय घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. ठाणे आणि कल्याणची जागा अनेक दिवसांपासून ठाकरे गटाकडून हिटलिस्टवर होती. त्यामुळे ठाकरे गटाकडून ठाण्यात राजन विचारे हेच निवडणूक लढणार हे नक्की करण्यात आले आहे. सुषमा अंधारे यांनी कल्याणमध्ये जाऊन अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्याकडून मोठी खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे. ज्यांचं नाव घेऊन  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकारण करतात त्या दिघेंच्या पुतण्यालाच, श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी तिकीट देण्याच्या हालचाली सध्या सुरु आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक मतभेद आहेत. अनेकदा हे मतभेद चव्हाट्यावर देखील आले आहेत. त्यातच डोंबिवलीमधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी श्रीकांत शिंदे यांचे काम करणार नसल्याचे सांगितले आहे. कल्याण पूर्वमध्ये भाजपच्या गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या महेश गायकवाडांवर भर पोलीस ठाण्यात गोळी चालवली होती. भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये वाद असताना आता केदार दिघे यांना कल्याणमधून तिकीट देऊन श्रीकांत शिंदे यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा:

बारामतीत धमक्या देत असाल तर मुंबई आणि ठाण्यात यायचं; संजय राऊतांचा अजित पवारांना इशारा

Manoj Jarange सभेत बोलणार तरी काय? सोलापुरात जरांगेंची भव्य सभा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss