Tuesday, April 30, 2024

Latest Posts

एमसीए निवडणुकीत शरद पवार यांचा संदीप पाटील, राजू कुलकर्णी यांना आशीर्वाद

भारतीय क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या मुंबई क्रिकेटच्या अध्यक्षपदी कोण बसणार ?याकडे अख्या राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेलं होतं. मंगळवारी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेचा कार्यक्रम पार पडला. या सभेत जे घडलं त्यापेक्षाही वेगळ्याच गोष्टी एमसीएच्या अण्टिचेंबर मध्ये घडल्या. त्यामुळेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी भारताचा माजी कसोटीवीर आणि तडाखेबंद फलंदाज संदीप पाटील यांची वर्णी लावण्याचे निश्चित झाले आहे. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष म्हणून माजी कसोटीवीर राजू कुलकर्णी यांची देखील उपाध्यक्षपदी वर्णी लागणार आहे.संदीप पाटील यांच्या अध्यक्षपदामागे शरद पवारांची संघटनेतील चाणक्यनिती कामी आली आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉक्टर विजय पाटील हे आहेत. येणाऱ्या २८ तारखेच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी आपणच उमेदवार असल्याचं विजय पाटील यांनी असोसिएशनच्या मतदारांना सांगत निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली होती. नवी मुंबई येथील बेलापूरच्या डी. वाय. पाटील हे सर्वेसर्वा असलेल्या पाटील यांनी एका अर्थाने शरद पवारांनाच आव्हान दिलं होतं. सध्या एम.सी.ए. मध्ये न्या. लोढा समितीमुळे शरद पवार, आशिष शेलार किंवा देवेंद्र फडणवीस हे निवडणूक लढवू शकत नाहीत. किंवा तिथल्या निवड प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत. तरीही ही नेते मंडळी कधी मंत्रालयातून तर कधी थेट असोसिएशनच्या व्यासपीठावरूनही आपल्याला हव्या त्या गोष्टी करून घेत असतात. त्यामुळेच शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि अमोल काळे या दोघांनी अध्यक्ष- उपाध्यक्ष बनण्याची स्वप्न बघायला सुरुवात केली होती.

हेही वाचा : 

रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, आदित्य ठाकरेंचा नवा आरोप

मिलिंद नार्वेकर यांनी पवारांकडून तर अमोल काळे यांनी फडणवीसांकडून लॉबिंग सुरू केलं होतं. मात्र राजकीय नेत्यांच्या निकटवर्ती यांना महत्त्वाच्या खुर्च्या देताना भारताच्या किंवा मुंबईच्या माजी क्रिकेटपटूंवर अन्याय होत त्यांना डावलले गेल्यास त्याचा फटका शरद पवारांना वेगळ्या अर्थाने बसू शकतो. समाजमाध्यमांचा सध्या बोलबाला असताना त्याची खूप मोठी किंमत पवारांना आणि राष्ट्रवादीला चुकवावी लागू शकते. यामुळे पवारांनी मुंबईच्या क्रिकेटला पोषक आणि खेळाडूंना,मैदान क्रिकेटला हवाहवासा वाटणारा निर्णय घेऊन संदीप पाटील यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केलेले आहे. विजय पाटील यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढवू नये,असे स्पष्ट संकेत वजा इशारा पवारांनी विजय पाटील यांना दिला. त्यानंतरही विजय पाटील यांची देहबोली ही पवारांसमोर फारशी सकारात्मक नसल्याचे लक्षात येताच क्रिकेटपटू समोर निवडणूक लढवल्यास पराभूत पदरी पडू शकतो अशी स्पष्ट कल्पना पाटील यांना दिल्याचं विश्वसनीय सूत्रांचा म्हणणं आहे.

आपल्या निवृत्तीनंतर कोणत्याही वादापासून दूर राहणाऱ्या संदीप पाटील यांनी रवी मांद्रेकर यांच्या माध्यमातून एमसीएच्या निवडणुकीची वाट धरली आहे.आजही संदीप पाटील यांची लोकप्रियता कमालीची आहे. ही गोष्ट एमसीएचा मतदार असलेल्या असलेल्या राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने शरद पवार यांच्या लक्षात आणून दिली. आणि त्यानंतर अमोल काळे असो किंवा मिलिंद नार्वेकर या राजकीय नेत्यांच्या निकटवर्तीयांना बाजूला सारत शरद पवारांनी संदीप पाटील याच्यासाठी अध्यक्षपदाची कवाडे उघडी केली आहेत. शरद पवार हे खेळाडूंच्या निवड प्रक्रियेमध्ये गेल्या २२ वर्षांत चुकूनही पडलेले नाहीत. हे जरी खरं असलं तरी मुंबई क्रिकेट मधली वशिलेबाजी आणि बड्या खेळाडूंच्या मुलांची कामगिरी होत नसतानाही निवड समितीकडून त्यांचे पुरवले जाणारे लाड हे काही शरद पवार थांबवू शकलेले नाहीत. त्यामुळे एमसीएची बदनामी होत असल्याची ही गोष्ट अनेकांनी पवारांच्या लक्षात आणून दिली. त्यातच पवारांना आव्हान देत १४ मार्चला सर्वसाधारण सभेची आयोजकाची भूमिका पार पाडणाऱ्या माजी अध्यक्ष रवी सावंत यांना या निवडणुकीत अद्दल घडवण्याचंही पवारांनी निश्चित केले आहे.

ऍमेझॉन प्राइमचा पहिला भारतीय सिनेमा प्रदर्शित होणार, धकधक गर्ल मुख्य भूमिकेत दिसणार

रवी सावंत यांना आपला मुलगा नील सावंत याच्याकडे कोणतेही क्रिकेट विषयक कौशल्य नसतानाही कार्यकारणी मध्ये प्रमुख पदावर बसवायचे होते. मात्र मुंबई क्रिकेट असोसिएशन मधून भारतीय क्रिकेट बोर्डात महत्त्वाच्या पदावर काम केलेल्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने शरद पवारांना या सगळ्या वशिलेबाजीची गणित समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या पवारनिष्ठेसाठी परिचीत नेत्याने मुंबई क्रिकेट मधली वशिलेबाजी आणि विशिष्ट पदाधिकाऱ्यांमधला आर्थिक व्यवहार पवारांसाठी भविष्यात कसा तापदायक होऊ शकतो हे देखील समजावून सांगितले. त्यानंतर वेगात सूत्र हलवणा-या शरद पवारांनी शिवसेना-भाजपच्या झेंड्यांसह एमसीएत वावरणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आपल्या मागे फरफटत यायला भाग पाडले. राज्याच्या सत्तेत असलेल्या शिवसेना -भाजप मधील आशिष शेलार हे माजी अध्यक्ष देखील या फरपटीला अपवाद ठरलेले नाहीत. पवारांच्या समोर स्वतंत्र गट किंवा पदाधिकारी निवडून आणण्याची परिस्थिती सध्या तरी आशिष शेलार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुणाच्याही क्षमतेत नाही हे पुन्हा एकदा पवारांनी अधोरेखित केलेले आहे. एकूणच काय तर मुंबई क्रिकेटवर या घडीला तरी पूर्णतः शरद पवारांचीच पकड असल्याचं मंगळवारी रात्री स्पष्ट झाले.

वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प राज्याला देऊ, उदय सामंतांचे आवाहान

Latest Posts

Don't Miss