Wednesday, May 1, 2024

Latest Posts

९.१५ वाजता लाडक्या लालबागच्या राजाला दिला अखेरचा निरोप, कुणाचे ऊर भरून आले, तर कुणाचा कंठ दाटला

गुलालांची उधळण… डीजे दणदणाट… भक्तीभावाने बेधूंदपणे नाचणारे भाविक… कधी वरुणराजाची कृपा… तर कधी ऊन्हाचं पांघरूण… तब्बल 22 तासांपासून लालबागचा राजाची मिरवणूक निघाली.

गुलालांची उधळण… डीजे दणदणाट… भक्तीभावाने बेधूंदपणे नाचणारे भाविक… कधी वरुणराजाची कृपा… तर कधी ऊन्हाचं पांघरूण… तब्बल 22 तासांपासून लालबागचा राजाची मिरवणूक निघाली. लालबाग ते गिरगाव चौपाटीपर्यंत हेच चित्र सर्वत्र दिसत होतं. संपूर्ण लालबाग ते गिरगाव चौपाटीचा परिसर भक्ती आणि शक्तीने, उत्सव आणि उत्साहाने फुलून गेला होता. बघावे तिथे गर्दीच गर्दी दिसत होती. भाविकांचा अलोट जनसागर लोटला होता. गिरगाव चौपाटीवर आपल्या लाडक्या राजाला निरोप देताना कुणाचे ऊर भरून आले होते, तर कुणाचा कंठ दाटून आला होता. पुढच्या वर्षी लवकर या… चैन पडे ना आम्हाला… अशी भावनिक साद घालत लालबागच्या राजाला (Lalbaugcha Raja 2023) भाविकांनी निरोप दिला.

नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला, लालबाग-परळकरांसोबतच अखंड गिरगाव आणि जगभरातील भक्तांचं श्रद्धास्थान असलेला लालबागचा राजा दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर भक्तांचा निरोप घेतला. मुंबईसह देशभरात प्रसिद्ध असलेला लालबागच्या राजाची मिरवणूक गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास मंडपातून निघाली होती. शुक्रवारी सकाळी ८ वाजता लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहचला तेव्हा लाखोंच्या जनसमुदायाने हात उंचावून बाप्पाचं दर्शन घेतले. तर सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी लालबागच्या राजाचे समुद्राच्या पाण्यात विसर्जन करण्यात आले.

कोळी बांधवांकडून लालबागच्या राजाला बोटींची सलामी देण्यात आली. समुद्रात मध्यभागी लालबागचा राजा असलेला तराफा आणि आजूबाजूला कोळी बांधवांच्या बोटी पाहायला मिळाल्या. चौपाटीपासून काही अंतरावर आत अरबी समुद्रात जात लालबागच्या राजाचं विसर्जन झालं. यावेळी पोलिसांचा देखील बंदोबस्त होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी झाली होती. अगदी २४ तास रांगेत उभं राहून भक्त राजाच्या चरणी नतमस्तक होताना पाहायाला मिळाले. गणेशोत्सवादरम्यान नेते, कलाकार, सामन्यांनी त्याचं दर्शन घेतलं. दहा दिवस मनोभावे पूजाअर्चा करुन बाप्पा जड अंत:करणाने निरोप देण्यात आला. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीतही भक्तांचा अलोट जनसागर लोटला होता.

हे ही वाचा: 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

अनंत चतुर्दशीचे महत्व, जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss