Tuesday, April 30, 2024

Latest Posts

पहिल्या टप्प्यासाठी यंत्रणा सज्ज,१९ एप्रिलच्या मतदानासाठी ‘इतके’ मतदान केंद्र

महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदार संघामध्ये १९ एप्रिल  रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण १०,६५२ मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या निवडणुकीत ९५,५४,६६७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती)(वृत्त व जनसंपर्क) डॉ.राहुल तिडके उपस्थित होते. 
 
यावेळी माहिती देताना चोक्कलिंगम म्हणाले, पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत एकूण ९७ उमेदवार लढत आहेत. या निवडणूकीसाठी लागणारे साहित्य, साधनसामग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदार कर्मचारी व अधिकारीवर्ग उपलब्ध आहेत. तसेच पोलीस कर्मचारीवृंद तैनात ठेवण्यात आले आहे. या मनुष्यबळाचे रॅण्डमायझेशन (Randomization) करुन त्यांच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत.  तसेच गडचिरोली मतदारसंघात सात हॅलिकॉप्टर पाठविण्यात आले आहेत. यंत्रणा पूर्ण तयारीनिशी निवडणुकीसाठी सज्ज असून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्व मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, असे आवाहन चोक्कलिंगम यांनी यावेळी केले. 
 

मतदान केंद्र सुरक्षेसह सज्ज

 
मतदान केंद्रावर पुरवण्यात येणाऱ्या ईव्हिएम व व्हिव्हिपॅटची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचेही रॅण्डमायझेशन (Randomization) झाले आहे. या पाच लोकसभा मतदारसंघामध्ये ईव्हिएम व व्हिव्हिपॅट मशीन्सची विधानसभा मतदारसंघनिहाय कमिशनिंग (Commissioning) करण्यात येत आहे. संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये सीआरपीएफ (CRPF) च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. 
 

दिव्यांग व ज्येष्ठांसाठी विशेष सुविधा

 
८५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह  मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या  ठिकाणी रॅम्पची व व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामध्ये ईटीपीबीएसद्वारे एकूण ९,४१६ मतदार तर १२डी या अर्जाद्वारे ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग असे एकूण ६६३० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.  मतदानाची सर्वसाधारण वेळ सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आहे. गडचिरोली-चिमुर या लोकसभा मतदार संघातील आमगांव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी या चार विधानसभा मतदारसंघात व भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदार संघातील अर्जुनी मोरगांव एका विधानसभा मतदारसंघात अशा एकूण पाच विधानसभा क्षेत्रामध्ये मतदानाची वेळ सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. 

मतदानाच्या ४८ तास आधी प्रचारास बंदी

 
मतदान संपण्याच्या वेळेच्या ४८ तास आधी पाचही लोकसभा मतदार संघामध्ये सायलन्स पिरियड (Silence Period) आहे. या लोकसभा क्षेत्रामध्ये ४८ तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच या मतदार संघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत. राज्यातील पहिल्या टप्प्यातील ५ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी सर्व तयारी झालेली आहे. या पाच लोकसभा मतदार संघातील निवडणूकांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी सर्व मतदारांनी पुढे येण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून करण्यात येत आहे. मतदान करण्याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन वोटर गाईड देण्यात आले आहे. मतदारांना मतदार वोटर स्लिप उपलब्ध करून दिल्या आहेत. इपीआयसी (EPIC) व्यतिरिक्त कोणते दस्तऐवज मतदानासाठी वापरता येतील याबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देवून जनजागृती करण्यात आली आहे. आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी मतदान केंद्रे आवश्यक सोयी-सुविधांसह सुसज्ज आहेत. 
 

Latest Posts

Don't Miss