Tuesday, April 30, 2024

Latest Posts

‘बिनशर्त’ पाठिंब्यानंतर आता MNS महायुतीसाठी उतरणार प्रचाराच्या मैदानात!

आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देणार असल्याची घोषणा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केली होती. त्यानंतर आज (शनिवार , १३ एप्रिल) मनसेच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. आता, मनसे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचा प्रचार करताना दिसणार आहे.

राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, “२०१४-२०१९ या काळात, मी नरेंद्र मोदी सरकारवर जी टीका केली ती व्यक्तिगत टीका नव्हती तर मुद्द्यांवरची टीका होती. आणि गेल्या ५ वर्षात ज्या चांगल्या गोष्टी मोदींच्या सरकारने केल्या, त्याचं कौतुक देखील मी केलं. काश्मीरमधून ३७० कलम हटवणं, अयोध्येत राम मंदिर उभारल्यावर त्याचं कौतुक पण मीच केलं होतं. धर्माच्या आधारावर आपल्याला राष्ट्र उभं नाही करायचं आहे, परंतु १९९२ पासून २०२४ पर्यंत राम मंदिर रखडलं होतं, जे २०२४ ला उभं राहिलं ह्याचा निश्चित मला आनंद आहे आणि ह्याचं कौतुक पण मी केलं.” “एनआरसीचा विषय असेल, ३७० कलमाचा विषय असेल किंवा राम मंदिराचा विषय असेल, नरेंद्र मोदी पंतप्रधान नसते, तर हे विषय प्रलंबितच राहिले असते. त्यामुळे मी अनेक वेळा मोदींना फोन करून त्यांचं चांगल्या कामांसाठी व्यक्तिशः अभिनंदन देखील केलं आहे. त्यामुळे अजून काही चांगल्या गोष्टी घडवायच्या असतील तर एका बाजूला कडबोळं नेतृत्व आणि दुसरीकडे एक सक्षम नेतृत्व असा पर्याय असताना नरेंद्र मोदींच्या सक्षम नेतृत्वाला अजून एक संधी मिळायला हवी असं मला वाटलं आणि त्यातून नरेंद्र मोदींना पाठींबा द्यायचा निर्णय आमच्या पक्षाने घेतला.” “मोदी गुजरातचे आहेत. त्यांचे गुजरातचे प्रेम ठीक आहे, पण सर्व राज्याकडे त्यांनी त्याचप्रमाणे लक्ष द्यावं. पक्षातील नेत्यांशी पाठिंबा दिला त्यासंदर्भात संवाद साधला. महायुतीचा प्रचार करण्यासाठी आणि समन्वय करण्यासाठी आमची बैठक झाली.” असे ते म्हणाले.

आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचार करण्यासाठी प्रचाराची जबाबदारी संबंधित नेत्यांवर देऊन त्यांची नावे जाहीर करण्यात येतील, असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. “शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप यांच्या उमेदवार आणि नेत्यांनी आमच्या कोणत्या नेत्यांशी समन्वय साधायचा, यासंदर्भातील यादी पुढच्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येईल.” “प्रचारासाठी सभा घ्यायच्या, कुठे घ्यायच्या ह्याचा निर्णय चर्चेअंती घेतला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

 
 
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss