Saturday, April 27, 2024

Latest Posts

बारामतीत शिवतारेंच्या झटक्याने रासपच्या जानकरांना एका जागेची लॅाटरी

बारामती लोकसभा मतदार संघात होणाऱ्या लढतीकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांच्यात कॅांटे की टक्कर होत असताना माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आपली उमेदवारी जाहीर करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या डोक्याचा ताप वाढवलाय. विजय शिवतारेंनी अजित पवारांना झटका दिला असताना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना लोकसभेच्या जागेची लॅाटरी लागली आहे.

२०२४ च्या लोकसभेत राज्यातील सर्वात हाय होल्टेज ड्रामा बारामती लोकसभा मतदार संघात होऊ घातला आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या उमेदवार आहेत. त्यांना त्यांचीच वहिनी असलेल्या राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या सुनेत्रा अजित पवार यांनी आव्हान दिले आहे. ही लढत प्रचंड रंगतदार होणार आहे, ती माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या उमेदवारीमुळे. येत्या २७ तारखेला निवडणुकीचा अर्ज भरणाऱ्या विजय शिवतारे यांनी शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विनंती वजा आदेश धुडकावून आपले आव्हान कायम ठेवायचे ठरवले आहे. विजय शिवतारे जी मते घेतील ती प्रामुख्याने सुनेत्रा अजित पवारांच्या वाट्याची असतील. या मतदार संघात धनगर समाजाच्या मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे कालपर्यंत शरद पवारांकडे महाविकास आघाडीकडून माढ्याच्या किंवा कोणत्याही एका लोकसभेच्या जागेसाठी याचना करणाऱ्या रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना आज अचानक वर्षावर झालेल्या महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत एका जागेची लॅाटरी लागली आहे.

माढ्याची लोकसभेची जागा भाजपने रणजित नाईक निंबाळकर यांना घोषित केली आहे. परभणीची जागा राजेश विटेकर हे राष्ट्रवादीकडून लढवण्याची शक्यता आहे. इथले सेनेचे विद्यमान खासदार बंडू जाधव यांच्याकडून अत्यंत कमी मताधिक्याने राजेश विटेवर पराभूत झाले होते . बारामतीतून सुनेत्रा पवार यांनी प्रचाराला सुरूवातही केली आहे. या तीनही मतदार संघातील धनगर मतांच्या प्रभावामुळे महादेव जानकर यांनी माढा किंवा परभणी ही जागा मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मविआ त्यांच्या मागणीला प्रतिसाद देताना दिरंगाई करतेय हे पाहून महायुतीने आपला डाव टाकत जानकर यांच्या रासपला एक जागा सोडण्याची तयारी दाखवली. या महत्वपूर्ण निर्णयाची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आज केली आहे. ‘वर्षा’वर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आणि सुनिल तटकरे यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

महायुतीच्या या निर्णयामुळे अजित पवारांबरोबर तुंबळ राजकीय युध्द करण्यासाठी बाह्या सरसावून उतरलेल्या माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या मुळे होणारे नुकसान महादेव जानकरांच्या महायुतीत राहण्याने भरून निघणार आहे. त्यामुळे अजित पवारांना झटका देण्यासाठी लोकसभेच्या रिंगणात उतरणाऱ्या विजय शिवतारेंमुळे महादेव जानकरांना लॅाटरी लागली आहे. मविआ नेत्यांच्या दिशेने झुकणाऱ्या जानकरांना आपल्या बाजूने खेचणाऱ्या महायुतीच्या नेत्यांनी शरद पवारांना जोर का झटका धीरे से दिला आहे.

हे ही वाचा:

लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा एक उमेदवार जाहीर केल्यानंतर पंकजा मुंडेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या….

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर Manoj Jarange यांची घोषणा, मराठा उमेदवार उभा केला तर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss